बुढाना : भारतीय किसान युनियनच्यावतीने भैसाना साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाकियू कार्यकर्त्यांनी ऊस विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकले. त्यानंतर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि ऊस व्यवस्थापक शेतकऱ्यांच्या भेटीला आले. थकीत ऊस बिलांपैकी २५ कोटी रुपये ३० जूनपर्यंत आणि ऑक्टोबरपर्यंत सर्व थकीत ऊस बिले देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सकाळी ११ वाजता आंदोलनस्थळी भाकियू कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर तालुकाध्यक्ष अनुज बालियान, ब्लॉक अध्यक्ष संजीव पवार यांच्यासह कार्यकर्ते ऊस विभागाच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यानंतर कारखान्याचे उपाध्यक्ष जंगबहादुर तोमर आणि ऊस व्यवस्थापक शिव कुमार त्यागी यांनी शेतकऱ्यांची भेट घेवून थकीत बिलांबाबत चर्चा केली.
कारखाना उपाध्यक्ष तोमर यांनी सांगितले की, ३० जूनपर्यंत २५ कोटी रुपये दिले जातील. जुलै महिन्यात ४८ कोटी रुपये, ऑगस्ट महिन्यात ६० कोटी रुपये आणि सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांचे उर्वरीत ८० कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर कुलूप काढण्यात आले. यावेळी खाप मंत्री सुभाष बालियान, विकास त्यागी, सुधीर सहरावत, पिंटू, अजीत, तैमूर राणा, इसरार, अनिल सैनी, अकबर, बाबू, सोहनवीर, प्रवीण, सोबीर, राजबीर सिंह, विपिन, धीर सिंह उपस्थित होते.