म्हैसूर : बिबट्याच्या हल्ल्यात दोन आठवड्यांमध्ये दोन लोकांनी जीव गमावल्यामुळे उपायुक्त डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनी एक आदेश जारी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊस तोडणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला मदत मिळणार आहे. मुख्य वन संरक्षक डॉ. मालती प्रिया यांनी सांगितले की, कोडगूमधील शार्प शुटर्ससोबत वन अधिकाऱ्यांची दहा पथके नागरहोल आणि बांदीपूर वन्यजीव अभयारण्यातील खास विभागात शोधमोहीम राबवत आहेत. प्रत्येक पथकांमध्ये १०-१२ सदस्यांचा समावेश आहे.
प्रिया यांनी सांगितले की, सप्टेंबर ते जानेवारी हा बिबट्यांचा प्रजनन काळ आहे. मात्र, शोधमोहिमेत ऊस पिकाचा मुख्य अडथळा येत आहे. त्यामुळे आम्ही ऊस तोडणी लवकर करण्याविषयी महसूल अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. कर्नाटक वन विभागाने आधीच एक बिबट्याविरोधात शूट-ऑन-व्हीजनचा आदेश जारी केला होता, या बिबट्याच्या हल्ल्यात म्हैसूरमध्ये एक २२ वर्षीय महिला बळी पडली आहे.
प्रिया यांनी सांगितले की, आमचा मुख्य उद्देश बिबट्यांना लोकांवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा आहे. त्यांनी सांगितले की, भात आणि नाचण्याच्या शेतांमध्ये हत्तींचा शोधमोहिमेसाठी वापर करणे अवघड आहे. त्यामुळे या विभागात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे. १६ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. आणि २० ड्रोन कॅमेरे वापरले जात आहेत. मल्लिकार्जुन डोंगर आणि ओडगल्लू रंगनाथस्वामी डोंगर जंगल परिसरात एक ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही मल्लिकार्जुन डोंगर क्षेत्राजवळ शोधमोहीम वाढवली आहे. येथे बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. २१ ग्राम पंचायतींच्या सीमांवर ४२ गावांना बिबट्यांबाबत अलर्ट करण्यात आले आहे.