नंदूरबार : नागाई शुगर मिल ने ऊस बिल थकविल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत ऊस बिल व्याजासह त्वरित मिळावे, यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी डिस्टलरीचे उत्पादन बंद पाडून युनिटला कुलूप लावले. दोन दिवसात ऊस बिलाबाबत ठोस निर्णय न झाल्यास सोमवारपासून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले.
पुरुषोत्तमनगर येथील नागाई शुगर लिमिटेडने २०२२- २३ मध्ये गाळप केलेल्या उसाचे अद्याप बिल दिलेले नाही. थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने दिली, आंदोलन केले तरीही बिले दिली गेली नाहीत. ६ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सहायक निबंधक नीरज चौधरी यांच्या उपस्थितीत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी 27 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 27 जुलैला शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. २८ जुलै रोजी शेतकरी कारखान्यावर आले, मात्र त्यांची संचालक मंडळ अथवा कारखान्याचे अधिकारी यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचा उपप्रकल्प असलेल्या सातपुडा डिस्टलरीमधील उत्पादन बंद पाडून युनिटला कुलूप लावले. शेतकऱ्यांनी व्याजासह थकीत बिले द्यावीत, अशी मागणी केली आहे. निवेदनावर सुनील पाटील, रामचंद्र चौधरी, देविदास पाटील, मनीष चौधरी आदीसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.