उसाला चांगल्या दराचा आदर्श नागनाथअण्णांनी निर्माण केला : मंत्री प्रकाश आबिटकर

सांगली : क्रांतिवीर स्वातंत्र्य चळवळीत नागनाथअण्णांनी इतर स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र करून मोठा लढा दिला. सोबत काम करणाऱ्या लहान व्यक्तीलासुद्धा ते कधी विसरले नाहीत. देश स्वतंत्र झाल्यानंतर अण्णा थांबले नाहीत. त्यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी अनेक चळवळी उभारल्या. नागनाथ अण्णांनी ऊस दरासाठी आंदोलने सुरू होण्यापूर्वीच उसाला चांगला दर देऊन आदर्श निर्माण केला होता, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. वाळवा येथे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या तेराव्या स्मृतिदिनी आयोजित सभेत ते बोलत होते.

कार्यक्रमात नागनाथअण्णा व कुसुमताई नायकवडी यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, “देशसेवा करत असताना नागनाथअण्णांनी जीवनात अनेक त्याग केले. जनतेसाठी त्यांनी स्वातंत्र्यानंतरही लढा सुरू ठेवला. हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी प्रास्ताविकात नागनाथ अण्णांचा जीवनपट उलगडला. नागनाथअण्णांची नात मधुरा वैभव नायकवडी ही एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गौरव नायकवडी, बाळासाहेब नायकवडी, आर. एस. चोपडे यांनी मनोगतात क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. प्रा. राजा माळगी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, विशाखा कदम, वीरधवल नायकवडी, कार्यकारी संचालक राम पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here