नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम २०२४-२५ साठी पहिली उचल अडीच हजार रूपयांची असणार आहे. कार्यक्षेत्रातील उत्पादकांनी त्यांचा नोंदलेला ऊस इतर कारखान्यांना गाळपास देण्याची घाई करू नये, नियमाप्रमाणे सर्वांचा ऊस ३१ मार्चपर्यंत गाळप करण्यात येईल, अशी माहिती या कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी दिली.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या चालू असलेल्या गाळप हंगामात कारखान्याच्या युनीट क्रमांक एक लक्ष्मीनगर, देगाव-येळेगाव (ता.अर्धापूर, जि. नांदेड) मध्ये आतापर्यंत २.४८ लाख मेट्रीक टन ऊस व युनिट क्रमांक दोन शिवाजीनगर, (डोंगरकडा, ता. कळमनुरी) आजपर्यंत १.४२ लाख मे.टन असा एकूण ३.९० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप मार्चअखेर पूर्ण होणार आहे.
कारखान्याने जानेवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत गाळप केलेल्या उसास प्रथम हप्ता २३१० रुपये दिला आहे. बाजारातील साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे शनिवारपासून गाळपास आलेल्या उसास प्रथम ऊसबिल, अडीच हजारांप्रमाणे अदा करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. ऊस बिलाची अंतिम रक्कम कारखान्याचे गाळप हंगाम संपल्यानंतर साखर उतारा व झालेल्या गाळपावर एफआरपीच्या नियमानुसार संबंधित ऊस पुरवठादारांना कराराप्रमाणे देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.