नांदेड : अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मागील आर्थिक वर्षात कारखान्यास सुमारे अडीच कोटींचा नफा झाला आहे. मात्र आधीच्या मोठ्या संचित तोट्यामुळे ऊस उत्पादकांना महसुली उत्पन्न सूत्रानुसार अतिरिक्त लाभ देण्यात अडथळे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखान्यावर राज्य बँकेसह इतर वित्तीय संस्थांचेही मोठे कर्ज आहे. त्यामुळे मागील काही वर्षात कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक आणि सभासद, काही संस्थांकडून ठेवी जमा स्वीकारण्याचा पर्याय निवडला. या ठेवीदारांना राष्ट्रीयकृत बँकेच्या व्याजदरानुसार व्याज देण्याची तरतूदही केली. तशाच पद्धतीने ठेवी आणि कर्जे घेण्याचा विषय वरील वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेवर पुन्हा ठेवण्यात आलेला आहे.
कारखान्याच्या उपर्युक्त संस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी कारखानास्थळावर होणार आहे. कारखान्याचे संस्थापक खा. अशोक चव्हाण हे सभेमध्ये सभासदांसाठी नवी घोषणा करतील अशी शक्यता आहे. नांदेड विभागातील काही साखर कारखान्यांनी मागील हंगामात ऊस उत्पादकांना प्रती टन २८०० रुपये वा त्याहून अधिक दर दिला. मात्र, कारखान्याची घसरण झाली आहे. कारखान्याने कशीबशी एफआरपीची पूर्तता केली. हंगाम संपल्यानंतर वर्षभरातील खर्च वजा जाता शिल्लक रक्कम सभासदांमध्ये वाटप करण्याची मुभा कारखान्यांना असते. पण आमच्या कारखान्याची मजल एफआरपीच्या पुढे जाऊ शकत नसल्याचे कार्यकारी संचालकांनी स्पष्ट केले आहे.