नांदेड : नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता आटोपला आहे. यंदा या कारखान्यांनी १,१७,६६,५४५ टन उसाचे गाळप केले. त्यातून १,२०,६५,०८७ क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. यंदा तुलनेने १२ लाख टन उसाचे गाळप अधिक झाले आहे. साखरेचा सरासरी उतारा १०.२५ टक्के आहे. मागील वर्षी ३० साखर कारखान्यांनी एक कोटी पाच लाख टन उसाचे गाळप केले होते, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.
नांदेड विभागात २०२२-२०२२ मध्ये २७ कारखांनी एक कोटी ४७ लाख आठ हजार ३४७ टन उसाचे गाळप, एक कोटी ५३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. २०२२-२०२३ मध्ये ३० कारखान्यांनी एक कोटी पाच लाख टन उसाचे गाळप केले होते. तर २०२३-२०२४ मध्ये २९ कारखान्यांनी एक कोटी १७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. यंदा विभागात २९ कारखाने सुरू झाले होते. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर कारखान्याचा समावेश होता. परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यांत दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील सहा सहकारी व पाच खासगी कारखान्यांचा समावेश होता. आता सर्व कारखाने बंद झाल्याने विभागाचा गाळप हंगाम आटोपला आहे.