नांदेड : पश्चिम महाराष्ट्रात पहिला हप्ता तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत कारखानदार काढत आहेत. मराठवाड्यात नॅचरल शुगर्स कारखान्याने ने २७०० ची पहिली उचल देऊ केली. जिल्ह्यातील कारखानदारांनी मात्र आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. त्यामुळे ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदार, शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन दराचा तोडगा काढावा अशी मागणी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले, शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केली.
याबाबत प्रल्हाद इंगोले म्हणाले की, यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले. अद्याप कारखानदारांनी शेतकऱ्यांना बिले अदा केली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने साखर कारखानदार व शेतकरी प्रतिनिधींची बैठक बोलावून पहिली उचल किती देणार यावर तोडगा काढावा. यावेळी शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील-हंगरगेकर, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम-कोंढेकर, अरुण पोपळे, बंटी पाटील-शिंदे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आवरदे, दीपक शिंदे, माधव शिरोळे, संजय पाटील ओम प्रकाश कदम, मुरलीधर जोगदंड, कैलास कदम उपस्थित होते.