नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव श्यामराव तिडके यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांचे नेतृत्व लाभलेल्या कारखान्यात अनेक वर्षांपासून गणपतराव तिडके हे अध्यक्षपद भूषवत होते. प्रकृती साथ देत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजात भाग घेता येत नाही, असे कारण नमूद करून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा कारखान्याचे उपाध्यक्ष नरेन्द्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
१९९०च्या दशकात अर्धापूर तालुक्यातील देगाव येळेगाव परिसरात भाऊराव चव्हाण कारखान्याची स्थापना झाली. नंतर या कारखान्याचे अध्यक्षपद निवृत्त पोलिस अधिकारी मोहनराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा गणपतराव तिडके यांच्याकडे आली. पंधरा वर्षांहून अधिक काळ त्यांनी कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले. भाऊराव चव्हाण कारखान्याने आपल्या मूळ प्रकल्पाच्या माध्यमातून डोंगरकडा कारखान्यासह वाघलवाडा येथील शंकर आणि हदगाव येथील हुतात्मा जयंतराव पाटील असे तीन कारखाने तिडके यांच्या अध्यक्षपदाच्या काळात खरेदी केले. पण चार कारखान्यांचा भार पेलता पेलता अनेक अडचणी उद्भवल्यानंतर मधल्या काळात दोन कारखान्यांची विक्री करण्यात आली.
साखर उद्योगाच्या बातम्या आणि संबंधित चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.