नांदेड : श्री सुभाष साखर कारखाना प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतात. ऊस नगदी पैसे देणारे पीक या भागातील शेतकऱ्यांनी इतर कुठल्याही पिकांवर अवलंबून न राहता नगदी पैसे देणाऱ्या, हमखास उत्पन्न देणाऱ्या ऊस लागवडीकडे अधिक भर द्यावा असे आवाहन कारखान्याने केले आहे. पूर्वी या भागात साखर कारखाना नसल्याने शेतकरी सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, मूग, हळद, केळी आदी पिके घेत असत.
याअगोदर जवळचे कारखाने ऊसतोड वेळेवर करत नसत. त्यामुळे ऊस अक्षरशः जाळून टाकावा लागला. वेळेवर ऊसतोड नसल्याने उत्पादनातही घट झाली. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीवर भर देत नसत असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. आता कारखाना असल्याने शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. उसाला प्रतिटन योग्य दाम, योग्यवेळी तोड आणि प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित असल्याने शेतकऱ्यांना अडचण येत नाही. त्यामुळे आम्ही उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतो, असे या भागातील शेतकरी सांगतात. कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांच्या उसाची तोड वेळेवर व्हावी, उसाला अधिकाधिक भाव मिळावा, शेतकऱ्यांचे जीवन आणि आर्थिक सक्षम व्हावे, याकरिता कारखाना प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे.