नांदेड : ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित विविध समस्यांवर विशेष चर्चा करण्यासाठी बुधवारी (ता. ३०) सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय येथे सकाळी साडेनऊला नांदेड येथील न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश दलजितजी कौर जज यांनी आढावा बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार, मुकादम, ऊस वाहतूकदार, अपघाती मयत ऊसतोड कामगारांचे जे वारस असतील त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
या बैठकीला तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेस सामाजिक न्याय विभाग, नांदेड यांच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीचे आयोजन सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, नमस्कार चौकाजवळ ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड येथे करण्यात आले आहे. संबंधित सर्वांनी या बैठकीस (ता. ३०) सकाळी साडेनऊला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.