नांदेड : नांदेड विभागातील लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड या चार जिल्ह्यांतील ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक कारखान्यांचे ऊस गाळप पूर्ण झाले आहे. येत्या आठवडाभरात कारखान्यांचे बॉयलर बंद होतील. यंदा लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्याने साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, हंगामाअखेर साखर कारखान्यांचे गाळप मार्चपर्यंत सुरू राहिल्याने साखरेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विभागातील २९ साखर कारखान्यांनी मार्चअखेर ९८ लाख ६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून ९५,२४,३४३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी उतारा ९.६६ टक्के आला आहे.
या हंगामापासून नांदेड जिल्ह्यात चार कारखान्यांतर्गत उसाची तोडणी ३८ यंत्रांद्वारे करण्यात आली. परभणी जिल्ह्यासाठी ५०, हिंगोलीसाठी १३ तर लातूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक १७७ ऊसतोडणी यंत्रांद्वारे उसाची तोडणी करण्यात आली. त्यामुळे यावर्षी ऊस कामगारांपेक्षा ऊस यंत्राद्वारे अधिक ऊसतोड करण्यात आल्याने हंगाम आटोक्यात आला आहे. चालू हंगामात नांदेड जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी एकूण २०,७५,२११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून १९,८२,९६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले, तर सरासरी उतारा ९.५६ टक्के इतका आला आहे. लातूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांनी ३३,९९,९७९ टन उसाचे गाळप केले. एकूण ३२,११,९३२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. परभणी जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २८,६०,८०९ मे. टन उसाचे गाळप केले. त्यापासून २८,१९,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. शिवाय हिंगोली जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी १५,२४,५१५ मे. टन ऊस गाळप करून १५,१०,००० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.