सांगली : जिल्ह्यात खतांचा वापर १० टक्के कमी करून उत्पादन खर्च कमी केला जाईल. यासाठी नॅनो युरीया व नॅनो डीएपीचा वापर वाढविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एकरी चारशे रुपये अनुदानावर ड्रोन उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील एक हजार क्षेत्रावर मोहीम राबवली जाणार आहे. कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी ही माहिती दिली. बेडग येथील शेतकरी सूरज पाटील यांच्या ऊस पिकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅनो युरीया फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यानंतर वेताळ यांनी माहिती दिली.
याबाबत माहिती देताना वेताळ म्हणाले की, केंद्र सरकारने खताचा वापर १० टक्के कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी नॅनो युरीया व नॅनो डीएपीचा वापर वाढविण्यात येणार आहे. मका, ऊस या पिकांसाठी नॅनो युरीया व सोयाबीन, उडीद, तूर या पिकांसाठी नॅनो डीएपी वापर शेतकरी करू शकतात. शेतकऱ्यांना एकरी चारशे रुपये अनुदानावर ड्रोन उपलब्ध होतील. दरम्यान, यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर, इफ्कोचे क्षेत्र अधिकारी रणजित देसाई, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अंकुश जाधव व यादव उपस्थित होते.