नवी दिल्ली : नरेंद्र मोदी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 4 जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसऱ्यांदा बहुमाताचा जादुई आकड़ा गाठला. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचा शपथविधी सोहळा 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता होऊ शकतो.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा शनिवारी होणार असल्याची शक्यता यापूर्वी वर्तविण्यात येत होती. शपथविधी समारंभाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी बैठक घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली. यावेळी पीएम मोदींनी सांगितले की, एनडीए विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करेल. आम्ही भारतातील 140 कोटी जनतेची सेवा करू आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी काम करू, असे पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी ट्विटमध्ये म्हटले आहे.