नाशिक : शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखाना यंदा रौप्यमहोत्सवी गळीत हंगामात सहा लाख टन ऊस गाळप करणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत मोबदला दिला जाईल, अशी माहिती कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी दिली. कारखान्याच्या गव्हाण पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. सभासदांच्या मागणीनुसार पंधरा दिवसात पहिला हप्ता तर जून महिन्यात दुसरा हप्ता देण्याचा प्रयत्न आहे. कारखान्यामार्फत एकरी १०० मे. टनाकडे झेप हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. नवापूर तालुक्यातील उसाचे गाळप द्वारकाधीश कारखान्यात केले जाईल, असेही सांगितले.
एकरी १०० टनापर्यंत उसाचे उत्पादन घेतलेल्या एकनाथ साळवे, कौतिक बोरसे, सुनील सोनवणे, सुनील पाटील, चंद्रेश गावित यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन झाले. जास्तीत जास्त प्रती एकरी ऊस उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. ऊस उत्पादकांना नविन ऊस जातीचे प्लॉट, खोडवा, निडवाचे प्रात्यक्षिक प्लॉट दाखवण्यात आले. शेतकी अधिकारी विजय पगार, संचालक सावंत यांच्या हस्ते उसाने भरून आलेल्या पहिली बैलगाडी व ट्रकचे पूजन करण्यात आले. राजेंद्र शिरवाडकर दीपक सोनवणे, बाळासाहेब देवरे, राजेंद्र सोमवंशी, बाजीराव बोडके, चंद्रकांत महाजन, काशिनाथ नंदन, विशाल आढाव, सरला अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भालेराव, बाळासाहेब कर्पे, शंकरराव साळुंके, भूषण नांद्रे, कैलास वाघ, अरविंद सोनवणे, सतीश सोनवणे उपस्थित होते.