नाशिक : कादवा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस बिलापोटी एफआरपीची पहिली उचल म्हणून २,३०० रुपये जाहीर केले आहेत. ही पहिली उचल ऊस उत्पादकांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात येत आहे. मात्र, ही रक्कम पुरेशी नसून एफआरपीची पहिली उचल किमान २,५०० रुपये द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळावर जाऊन संचालक मंडळाशी भेट घेत चर्चा केली. चर्चेअंती चेअरमन श्रीराम शेटे यांनीही ऊस उत्पादकांची मागणी रास्त असून संचालक मंडळ नक्कीच मागणी पूर्ण करेल असे आश्वासित केले.
संचालक मंडळाशी चर्चेवेळी सचिन बर्डे यांनी शेतकऱ्यांना बँक देणी, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण, दवाखाना, रासायनिक खते औषध विक्रेत्यांचे देणे, शेतीसाठी लागणारे भांडवल यांसारख्या अनेक बाबींसाठी पुरेशा पैशांची गरज आहे. कारखान्याने किमान २५०० रुपयांची पहिली उचल द्यावी अशी मागणी केली. श्रीराम आहेर यांनी सर्वसामान्य ऊस उत्पादकांच्या भावना मांडल्या. राहुल बोराटे यांनी बिबट्याच्या वावरामुळे ऊस शेती करणे धोक्याचे झाल्याचे सांगितले. उसाच्या नवनवीन प्रजातींची लागवड करूनही बऱ्याच उसाला तुरे येऊन वजनात घट होत असल्याचे सांगितले. लखमापूरचे बाळासाहेब सोनवणे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.