नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही गळीत हंगामाची यशस्वी सांगता होत तीन लाख ५२ हजार ५५७ टन उसाचे गाळप करुन सरासरी १२.१४ टक्के टक्के उतारा मिळवत तीन लाख ९३ हजार ५०० क्विंटल साखरनिर्मिती केली. यंदा दुष्काळी स्थिती असल्याने उसाची उपलब्धता कमी असल्याने त्यातच ऊसतोड मजूर टंचाईने राज्यातील सर्वच कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कादवाच्या इथेनॉल प्रकल्पातून १३ एप्रिलअखेर ३९ लाख ४१ हजार ५५ लिटर इथेनॉल निर्मिती झाली असून एप्रिलअखेर इथेनॉल प्रकल्प सुरू असणार आहे.
कादवाने १३० दिवसांत गळीत हंगाम पूर्ण केला असून, गळीत हंगामाची सांगता अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे हस्ते गव्हानीत नारळ टाकून झाली. श्रीराम शेटे यांनी हंगाम यशस्वी यशस्वी केल्याबद्दल ऊस उत्पादक, कामगार, ऊस तोड कामगार, ऊस वाहतूकदार, मालपुरवठादार यांचे आभार मानले. पुढील वर्षी जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. इतर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्याने मोठ्या प्रमाणात ऊस पळवापळवी होत त्याचा फटका छोट्या कारखान्यांना बसत आहे. त्यामुळे कमी दिवसात जास्त गाळप करण्यासाठी कादवाची गाळप क्षमता वाढवावी लागेल असे सांगितले.
युनियनचे अध्यक्ष भगवान जाधव यांची भाषणे झाली. यावेळी सर्व मुकादमांचा सत्कार करण्यात आला. प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक मंडळ, सर्व विभागाचे खातेप्रमुख, कामगार उपस्थित होते. कारखान्यातर्फे सभासदांना सवलतीच्या दरात दिली जाणारी साखरेची अंतिम मुदत बुधवार (ता. ३०) पयर्यंत असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.