नाशिक: येथील वसंतदादा सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्याची विक्री न होता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (शिखर बँक) तो भाडे कराराने चालविण्यास द्यावा, अशी मागणी शुक्रवारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली. याबाबत आमदार आहेर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिष्टमंडळासह भेटून निवेदन दिले. यासंदर्भात मंत्रालयात आज (सोमवार) बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार आहेर यांनी दिली.
आमदार नितीन पवार, वसाका बचाव कृती समितीचे निमंत्रक सुनील देवरे, देवळा कृउबा सभापती योगेश आहेर, विलास देवरे, उदयकुमार आहेर आदी उपस्थित होते. शिखर बँकेने कारखाना विक्रीची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. मात्र त्याची विक्री होऊ नये म्हणून गेल्या आठवड्यात कारखाना कार्यस्थळावर कारखाना बचाव कृती समितीच्यावतीने उपोषणदेखील करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सभासदांनी कारखाना विक्रीस प्रखर विरोध दाखवला. कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार वर्ग व कारखान्याच्या सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सर्वांची भावना वसाका विक्री न होता भाडे कराराने चालविण्यास शिखर बँकेने द्यावा, अशी आहे. हा कारखाना कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान समजला जातो.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.