नाशिक : निफाड साखर कारखान्याच्या जागा विक्रीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यानी जिल्हा बँकेला विचारला जाब

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्यालगतच्या जिल्हा बँकेच्या १०८ एकर जागेवर ड्रायपोर्ट प्रकल्प मंजूर आहे. जिल्हा बँकेला जमिनीची रक्कम अदा करून ही जागा ‘जेएनपीटी’ने ताब्यात घेतली आहे. परंतु, या जागेपैकी ११ एकर जागेवर लगतच्या निफाड कारखान्याची विविध साधनसामग्री बसविलेली आहे. असे असतानाही बँकेने ही जमीन ‘जेएनपीटी’ला विक्री करताना कारखाना प्रशासनाला विचारात घेतले नाही. कारखान्याची जागा जिल्हा बँक प्रशासनाने जेएनपीटीला परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत बँक प्रशासनाविरोधात गुन्हा का दाखल करू नये, अशी विचारणा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बँक प्रशासनाला केली.

जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी निफाडच्या प्रांताधीकारी हेमांगी पाटील, अष्टलक्ष्मी शुगर ॲन्ड इथेलॉन कंपनीचे लक्षण कदम, बी. टी. कन्स्ट्रक्शनचे बी. टी. कडलग, जिल्हा बँके प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक दीपक पाटील आदी उपस्थित होते. जेएनपीटी प्रशासनाचे अधिकारी बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते. हा विषय बँक प्रशासनाने लवकरात लवकर सोडविण्याचे आवाहन माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केले. तर पुढील बैठकीत यासंदर्भात काही तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here