लखनौ : राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय दक्षता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात या कारखान्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
देशात १६१ आणि राज्यात २४ सहकारी साखर कारखाने आहेत. त्यामध्ये बिजनौर येथील किसान सहकारी साखर कारखाना स्नेहरोड या कारखान्याला देशात सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार मिळाला आहे.
शाहजहांपूर येथील किसान सहकारी साखर कारखाना पुवायां या कारखान्यास जास्तीत जास्त साखर उत्पादन, तिलहर येथील साखर कारखान्याला ऊस विकास, सठियाव येथील साखर कारखान्याला तांत्रिक दक्षता तर रमाला येथील साखर कारखान्याला सर्वाधिक ऊस गाळपासाठी राष्ट्रीय दक्षता पुरस्कार देण्यात येणार आहे.
उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांनी सांगितले की, रमाला येथील साखर कारखान्याची गाळप क्षमता २७५० टीसीडीहून वाढवून ५००० टीसीडी करण्यात आली आहे. येथे २७ मेगावॅटचा को – जनरेशन प्लान्ट स्थापन करण्यात आला आहे. कारखान्याने पहिल्यांदाच, २०१९-२० या गळीत हंगामात ८३ लाख क्विंटल उसाचे गाळप करून राष्ट्रीय दक्षता पुरस्कार मिळवला आहे. स्नेहरोड साखर कारखान्याला सलग तीसऱ्या वर्षी देशात सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना म्हणून निवडण्यात आले आहे.