पुणे:आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे दिग्गज नेते,माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली. माजी मंत्री पाटील म्हणाले, गेली ६ दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. परंतु आज निर्णय करताना आम्ही जी भूमिका घेतो, ती जनतेची भूमिका असते. त्यामुळे आम्ही आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशीही चर्चा झाली. त्यांना माझ्या निर्णयाची कल्पना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंदापूरातील जाहीर मेळाव्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेली २ महिने मी तालुक्यातील गावागावांचा दौरा करतोय. नेमका निर्णय काय घ्यायचा यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दीड दोन तास राजकीय भूमिकेबद्दल चर्चा झाली. त्यांनी माझ्यासमोर काही प्रस्ताव ठेवले, मी माझी भूमिका मांडली. शेवटी निवडणूक लढवायची असेल तर ही जागा महायुतीतील विद्यमान सदस्य असतील ते लढवणार असं त्यांनी सांगितला. दुसरा पर्याय दिला तो व्यक्तिश: मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना स्वीकारणे योग्य वाटला नाही. राजकारणात आणि समाजकारणात व्यक्तिगत प्रश्नापेक्षा आपल्यामागील जनतेचं हित महत्त्वाचं असते. मी गुरुवारी सिल्व्हर ओकला शरद पवारांना भेटायला गेलो. तिथे दीड तास सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. फोनवरून जयंत पाटीलही होते. तुम्ही आमच्या पक्षात यावे, असा आग्रह पवारांनी धरला अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षात जावे असाच होता. त्यामुळे मी आणि आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जाण्याचा निर्णय जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.