धाराशिव : राष्ट्रीय किसान दिनानिमित्ताने प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे हेतूने नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड (रांजणी) चे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅचरल शुगर, परादीप फॉस्फेटस लिमिटेड (जय किसान) व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कोपरा येथे आयोजित शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी अंकुश देशमुख, इंद्रजीत देशमुख या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पीपीएल कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक चेतन भोसले यांनी केळी पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर यांनी आरोग्य पत्रिकेवर आधारित खत व्यवस्थापनाची माहिती दिली. त्यांनी मृदा आरोग्यामध्ये सेंद्रिय खतांचे महत्व, फर्मेंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर सोबत रासायनिक खतांची भट्टी लावून खतांची कार्यक्षमता वाढवण्याची पद्धती, पिकाच्या अवशेषांमध्ये सुप्त अवस्थेमधील किडींचे व घातक बुरशींच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्सचा वापर, खोडवा ऊसाचे व्यवस्थापन व पाचट कुजवण्याबाबत माहिती दिली.
नॅचरल शुगरच्या माध्यमातून माफक दरामध्ये नॅचरल ऑरगॅनिक फर्टीलायझर या भू-सुधारकाचा वापर करण्यासंदर्भात माहिती येळकर यांनी दिली. कृषी सहाय्यक पंडित काकडे यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले. ‘जय किसान’चे शेती सल्लागार अमजद पठाण यांनी भू-सुधारकांचा वापर करण्यासंदर्भात माहिती दिली. ‘बेस्ट ऍग्रो’चे प्रतिनिधी सुंदर उबाळे यांनी ऊस पिकामधील तणनाशक बाबत माहिती दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
…असे करा खोडवा ऊस व पाचट व्यवस्थापन
ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी यंत्र उपलब्ध असल्यास त्या यंत्राच्या सहाय्याने पाचटाची कुट्टी करावी.
कुट्टी यंत्र उपलब्ध नसल्यास, ऊस तुटून गेल्यावर पाचट सरीमध्ये एकसारखे पसरावे.
आंतरमशागत करून मोकाट पाणी द्यायचे असल्यास प्रत्येक सरीआड पाचट जमा करावे, ज्या सरीत पाचट नाही तेथे आंतरमशागत करता येते.
पाचटाचे आच्छादन केल्यानंतर किंवा कुट्टी केल्यानंतर ऊसाच्या बुडख्यावर पडलेले पाचट बाजूला करावे.
ऊसाचे बुडखे उंच राहिल्यास ते जमिनीलगत कोयत्याने किंवा ट्रॅक्टरचलित बुडखे छाटणी यंत्राने छाटून घ्यावेत.
रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऊसाच्या बुंध्यावर कार्बेन्डाझिम ५० % डब्ल्यू पी १० ग्रॅम व मॅलेथीऑन ५० % ईसी २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाचट कुजवणाऱ्या जिवाणूंची क्रिया जलदगतीने होण्यासाठी स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्यावे.
पाचटाचे कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवले पाहिजे, त्यासाठी पाचटावर
एकरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत पसरवून टाकावे.
पाचट कुजण्याची क्रिया जलद गतीने होण्यासाठी जिवाणू संवर्धक वेस्ट डीकंपोजर कल्चर घेऊन २०० लिटर पाण्यात मिसळावे त्यामध्ये दोन किलो गुळ मिसळावा, पाच ते सहा दिवसांनी तयार झालेले २०० लिटर वेस्ट डीकंपोजर द्रावण फवाऱ्याच्या सहाय्याने पाचटावर फवारावे.
– शिवप्रसाद येळकर, (ऊस विकास अधिकारी, नॅचरल शुगर, रांजणी)