धाराशिव : नॅचरल शुगरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी.बी.ठोंबरे यांनी वार्षिक सभेत नॅचरल शुगरच्या उत्तम व्यवस्थापनामुळे कारखान्याला चांगला नफा झाल्याने 25 टक्के लाभांश जाहीर केला.ते म्हणाले,कळंब तालुक्यातील रांजणी येथील‘नॅचरल शुगर’ला उपपदार्थांच्या माध्यमातून चालू आर्थिक अहवाल वर्षात साखर व स्टील विभागातील तोटा भरून काढून ७६.२९ कोटी रूपये नफा झाला आहे.यंदाच्या गाळप हंगामात नॅचरल शुगर मराठवाड्यात सर्वाधिक ऊसदर देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असेही ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
कारखान्याची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी बोलताना ते म्हणाले, दुष्टचक्रात सापडलेला साखर निर्मिती उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने केले आहे.कारखान्याने विक्रमी गाळप करूनही साखर उत्पादन तोटयात होते.नॅचरल शुगरने उपपदार्थ निर्मिती’मधून कारखाना नफ्यात आणला.या उद्योगाला उर्जितावस्था आणावयाची असेल उपपदार्थ निर्मिती उद्योगाशिवाय पर्याय नाही,असेही ते म्हणाले.ठोंबरे म्हणाले कि,यंदा पावसाची लातूर,धाराशिव आणि बीड जिल्ह्यावर विशेष कृपा झाली आहे. मांजरा प्रकल्प भरलेला आहे.त्यामुळे यंदा गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होणार आहे.ते म्हणाले, शेतकऱ्यांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा.उसाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला पाहिजे.
बी.बी.ठोंबरे म्हणाले कि, नॅचरल परिवाराच्या माध्यमातून विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी उसाची लागवड रोप पद्धतीने केली पाहिजे.रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर वाढला पाहिजे.त्यासाठी नॅचरल ऑर्गेनिक फर्टिलायजर हे सेंद्रिय खत विकसित केलेले आहे.यामध्ये खताचे सर्व घटक समाविष्ट करण्यात आहेत.शेतकऱ्यांनी जर या खताचीच मात्रा दिल्यास हेक्टरी शंभर टन उत्पादनाचे उद्दिष्ट्य गाठू शकतो,असेही ते म्हणाले.नॅचरल परिवारातील उद्योगांची वाटचाल अत्यंत पारदर्शीपणे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.