धाराशिव : यंदा मागणीच्या तुलनेत यावर्षी उसाचा पुरवठा कमी आहे. सध्या साखरेला बाजारात मागणी आणि उठाव असल्यामुळे रांजणी येथील नॅचरल शुगरने चालू गळीत हंगामात उसाला २७०० रुपये प्रति मे. टनाप्रमाणे पहिली उचल देण्याचे घोषीत केले आहे. चालू गळीत हंगामात एकूण ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे ऊस तोडणी व वाहतुकीचे नियोजन केले आहे. नॅचरल शुगरकडे ऊस गाळपास आल्यानंतर प्रत्येक पंधरवड्याचे बिल ऊस पुरवठादारांचे बँक खात्यावर जमा करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले आहे.
कळंब तालुक्यात रांजणी येथे नॅचरल शुगर, चोराखळी येथे धाराशिव शुगर हे दोन खाजगी साखर कारखाने आहेत. वाठवडा, मोहा, खामसवाडी येथे गूळ पावडर कारखाने आहेत. शिवाय ढोकी येथील तेरणा साखर कारखाना, केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखाना, गंगामाय साखर कारखाना, लातूर येथील विकास साखर कारखाना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, तडवळा येथील एस. पी. कारखाना कळंब तालुक्यात ऊस तोड करत आहेत. नॅचरल शुगरची पहिली उचल २७०० रुपयांप्रमाणे देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर कारखान्यांनीही उसाला भाव जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.