अहमदनगर : बर्याच मोठ्या नैसर्गिक अडचणीवर मात करुन सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सामुहीक प्रयत्न करुनच पुढे जावे लागेल असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2019-20 च्या 70 व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कारखान्याच्या वतीने सौ.शालिनीताई विखे पाटील व माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शालिनीताई म्हणाल्या, ही सहकार चळवळ आपण सर्वानीच सुरळीतपणे सुरु ठेवली आहे. भरपुर अशी संकटे आपल्यावर आली तरीही या संकटांवर मात करण्यासाठी कामगार, शेतकरी बांधव यांचे मोठे सहकार्य मिळाल्यामुळेच कारखान्याची वाटचाल चांगल्या पध्दतीने सुरु असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रत्येक गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला त्यामुळेच मागील काळातही आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखाना अडचणीतुन बाहेर काढला. दुष्काळी परिस्थितीतही कारखान्याने चांगल्या पध्दतीने गाळप केल आहे.
यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी चेअरमन या नात्याने कारखान्याचे धुरा हातात घेतली आहे. या गळीत हंगामात कारखान्यासमोर मोठ्या प्रमाणात आव्हान व अडचणी होत्या त्यामुळे हा हंगाम अवघड गेला. अशाही परिस्थितीमध्ये सर्व सभासद शेतक-यांनी ऊस पिकविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात पाणी टंचाई व नंतरच्या काळात अतिवृष्टी यामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप कमी झाले आहे. आव्हानात्मक व नैसर्गिक परिस्थितीवर मात करत डॉ.विखे पाटील कारखान्याने वेळोवेळी चांगले प्रयत्न केले.
प्रास्ताविक संचालक कैलास तांबे यांनी केले तर आभार कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव कडु यांनी मानले. कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव कडु, ट्रक सोसायटीचे चेअरमन जग्गनाथ राठी, डॉ.भास्करराव खर्डे, संचालक कैलास तांबे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, जि.प.सदस्या दिनेश बर्डे, संतोश ब्राम्हणे, साखर कामगार युनियचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, विक्रांत विखे, प्रतापराव तांबे, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.