पुणे : माळेगाव, सोमेश्वरच्या तुलनेत श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यास ऊस दरामध्ये ७०० ते ८०० रुपयांचा फटका बसला आहे. कामगार भरतीत कारखान्याचे वाटोळे झाले आहे. संचालक झाला तर योग्य भरती केली पाहिजे. छत्रपती शिक्षण संस्थेत काहीच नियमाने नाही. बिंदू नियमावली पाळली नाही. जवळचा आहे, घे चिकटवून आणि काही वर्षे झाले की म्हणतात, करा कायम, अशी परिस्थिती झाली आहे. कारखान्याला शिस्त लावावी लागले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या कारभाराचे सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये वाभाडे काढले. कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भवानीनगर येथे हा मेळावा घेण्यात आला होता.
पवार म्हणाले, छत्रपती कारखान्याची १० वर्षांनी निवडणूक होत आहे. छत्रपती कारखान्याच्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत, परंतु आताचा काळ वेगळा आहे. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. काही साखर कारखाने चांगले चालले असले, तरी अनेक साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत. साहेबराव जाचक अण्णासाहेब घोलप यांच्या कामाची पद्धत वेगळी होती, हे सांगण्याची गरज नाही. त्यांच्यापासून आप्पासाहेब पवार, पृथ्वीराज जाचक, दत्तात्रय भरणे, प्रशांत काटे व आतापर्यंत झालेल्या सर्वच अध्यक्षांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. पुढील पाच वर्षे पृथ्वीराज जाचक यांच्याकडे कारखान्याचे नेतृत्व देण्याचे ठरवले आहे. काही लोकांकडे कारखाने आहेत परंतु ते आमदारकीला व खासदारकीला निवडून येत नाहीत, असा टोला हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता अजित पवार यांनी लावला.
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, छत्रपती कारखान्याची निवडणूक ही इतर निवडणुकांप्रमाणे नाही. ही प्रपंचाशी निगडित असणारी निवडणूक आहे. यामध्ये राजकारण आणू नये. सभासदांच्या उसाला भाव व कामगारांना चांगला बोनस मिळाला पाहिजे, राजकीय हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. उमेदवारी कोणाला मिळते यापेक्षा नेत्यांचा आदेश सर्वांनी मान्य केला पाहिजे व छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, निर्दोष मतदार यादी हा सहकार चळवळीचा आत्मा आहे. सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या मेळाव्याला येण्याची तयारी दाखवली. मागे जे काही झाले ते सोडून देऊन छत्रपती कारखान्याला अडचणीतून बाहेर काढायचा आहे.