हिंगोली : सध्या शासनाचा साखरेला ३,१०० रुपयांचा भाव आहे. तर साखर तयार व्हायला ३७ रुपये तर विक्री भाव ३४ ते ३५ रुपये किलो आहे. उत्पादन किंमत व विक्री किमतीमध्ये तफावत असल्याने राज्यासह देशातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. ही तफावत तातडीने दूर करण्याची गरज आहे, असे मत पूर्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केले.
पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा व गव्हाण पूजन बुधवारी संचालक सुरेशराव आहेर व त्यांच्या पत्नी शारदा आहेर, संचालक शंकरराव इंगोले व त्यांच्या पत्नी ललिता इंगोले, सभासद तुकाराम चव्हाण व त्यांच्या पत्नी संचालिका मनीषा चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी दांडेगावकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम होते.
यावेळी दांडेगावकर यांनी सांगितले की, कारखान्याने यावर्षी ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना १५० ते १७५ दिवस चालला तरच बरोबरीत राहतो. मागील हंगामात पूर्णाने ४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ७६ लाख लिटर इथेनॉल व ५ कोटी ४७ लाख युनिट वीज निर्मिती केली असल्याची माहिती दांडेगावकर यांनी दिली. कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी प्रास्ताविक केले. शहाजीराव देसाई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शेतकरी, सभासद, ऊसतोड कामगार, वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.