कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने उपपदार्थ निर्मितीसह गाळप क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकहाती सत्ता दिली आहे. कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कारखान्यावर सुमारे १४० कोटींचे कर्ज आहे. मात्र, तालुक्यात पाणी प्रकल्प असल्याने ऊस क्षेत्र वाढीची संधी आहे. सध्या कारखाना क्षमता अडीच हजार मेट्रिक टनाची आहे याचे विस्तारीकरण करुन पाच हजार मेट्रिक टन करण्याची गरज आहे.
आजरा तालुक्याचा विचार केला तर तालुक्यात सुमारे साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होते. मात्र, कारखान्याला जेमतेम अडीच लाख मेट्रिक टन ऊस येतो. स्थानिक राजकारण, रुसवे-फुगवे व लवकर ऊस जाण्याचा आग्रह यामुळे ऊस बाहेर जातो. विस्तारीकरण झाल्यास गतीने ऊस गाळप होईल. यासाठी १२ ते १५ कोटी रुपये खर्च येईल. तो जिल्हा बँकेच्या माध्यमातून करणे शक्य आहे. गाळप वाढल्यास सर्व प्रश्न निकाली निघतील. क्षमता वाढविल्यास शेजारील तालुक्यांतून ऊस येवू शकतो. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.