अहमदनगर : महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी साखरेऐवजी उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले की, साखर कारखान्यासाठी नवे परवाने जारी करण्यावर तत्काळ बंदी घालण्याची गरज आहे.
द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गडकरी अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते योजनांच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. गडकरी म्हणाले, देशाला २४० लाख टन साखरेची गरज आहे. गेल्या वर्षी येथे ३१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. ही अतिरिक्त ७० लाख टन साखर इथेनॉलमध्ये रुपांतरीत झाली पाहिजे. केंद्र सरकारने आधीच इथेनॉल पंपांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनीही आपल्या परिसरात इथेनॉल पंप सुरू केले पाहिजेत.
अतिरिक्त साखर उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याच्या हानीकारक परिणामांबाबत चिंता व्यक्त करताना गडकरी म्हणाले, साखर उद्योग आज तोट्यात सुरू आहे. अशीच स्थिती कायम राहीली तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी पैसे मिळणार नाहीत. बँकांही तोट्यात जातील. साखर कारखाने बंद पडतील. त्यामुळे ऊसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनावर भर दिला पाहिजे. सरकार इथेनॉल खरेदी करण्यास तयार आहे. त्यातून भविष्यात सर्व पेट्रोलची वाहने इथेनॉलवर चालतील. आणि शेतकऱ्यांनाही पैसे मिळतील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link