शेतकरी, उसतोड कामगारांच्या मूलभूत प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष : प्रा. डॉ. मिलिंद आवाड

लातूर : शेतकरी, कष्टकरी, शेतमजुर, उसतोड कामगार यांचे शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय नेत्यांना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आगामी निवडणुकीत आपल्या प्रश्नांचा जाब विचारा, असे आवाहन मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांनी केले.

माजलगाव येथे कर्मवीर एकनाथराव आवाड उसतोड कामगार संघटना व मानवी हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने उसतोड कामगार हक्क परिषदेत ते बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मिलींद आवाड हे तर उद्घाटक म्हणुन राजेश घोडे होते.

आवाड म्हणाले की, उसतोड कामगार संघटनेमध्ये कारखानदारांच्या काही संघटनांनी शिरकाव केल्यामुळे उसतोड कामगारांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही, परंतु कर्मवीर एकनाथ आवाड उसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातुन राज्यातील उसतोड कामगारांचे प्रश्नांवर लोकशाही मार्गाने लढा उभारून प्रश्न सोडविण्यात येतील. उसतोड कामगारांनी आपली ताकत संघटनेच्या पाठीशी उभी करावी, असे आवाहन केले.

या परिषदेमध्ये उसतोड मजुरांना प्रति टन पाचशे रूपये मजुरी, प्रत्येक उसतोड कामगारांचा विमा उतरविला पाहिजे, ३४ टक्के झालेली भाववाढ याच हंगामात उसतोड कामगारांना द्यावी हे ठराव मंजुर करण्यात आले. यावेळी दयानंद स्वामी, तुकाराम येवले, धम्मानंद साळवे, मुसद्दीक बाबा, विष्णु मुजमुले, मोहन जाधव, अॅड. नारायण गोले, मधुकर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेश खंडागळे यांनी केले. सुत्रसंचालन महादेव उमाप तर आभार तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुजमुले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here