नेपाळमध्ये महागड्या साहित्याच्या आयातीला बंदी, श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीचा घेतला धसका

काठमांडू : नेपाळने औपचारिकरित्या व्हिस्की, तंबाखूसह मोटारी आणि इतर महागड्या साहित्याच्या आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय २ सार्वजनिक सुट्ट्या सुरू केल्या आहेत. आर्थिक तरलतेची कमतरता, परदेशी चलन भांडारातील घट पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था श्रीलंकेच्या मार्गाने जावू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. जुलै २०२१ नंतर नेपाळमध्ये वाढती आयात, पर्यटन आणि निर्यातीमधील घट यातून परकीय चलनात घट दिसून आली आहे. केंद्रीय बँकेच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२२ पर्यंत नेपाळमधील परकीय चलनाचा साठा जुलै २०२१ च्या मध्यातील ११.७५ अब्ज डॉलरवरुन १७ टक्क्यांनी घटून ९.७५ अब्ज डॉलरवर आला.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नेपाळच्या राष्ट्रीय बँकेचे डेप्युटी गव्हर्नर बम बहादूर मिश्रा यांनी सांगितले की, मंगळवारपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत, जुलै २०२२ पर्यंत ते लागू असतील. याबाबत एक नोटीस नेपाळच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. परकीय चलनातील घट रोखण्यासाठी मोटारी, २५० सीसीवरील मोटारसायकली, ३२ इंचापेक्षा मोठे टीव्ही, तंबाखू, व्हिस्कीसारख्या लक्झरी साहित्याच्या आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. नव्या तरतुदीनुसार फक्त आपत्कालीन वाहनांची आयात केली जाईल. निर्बंधांमध्ये हिरे, खेळणी, पत्ते आदींचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here