काठमांडू : सरलाहीस्थित अन्नपूर्णा साखर कारखान्याचे मालक राकेश अग्रवाल यांना पोलिसांनी फसवणूकीच्या आरोपावरून त्रिपुरेश्वर येथील राहत्या घरातून अटक केली आहे.
याबाबत नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते, वरिष्ठ अधीक्षक बसंत बहादूर कुंवर यांनी सांगितले की, सरलाही आणि नवलपराशी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याबद्दल अग्रवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश हे नवलपराशी येथील इंदिरा साखर कारखान्याचेही मालक आहेत. आम्ही प्राथमिक चौकशी सुरू केली आहे असे कुंवर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
नेपाळ सरकारच्या उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अन्नपूर्ण साखर कारखान्याने शेतकऱ्यांना फक्त ९९ लाख रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्याकडे एकूण १७० दशलक्ष रुपयांची शेतकऱ्यांची थकबाकी आहे. साखर कारखान्याच्या मालकांनी शेतकऱ्यांना थकीत पैसे न दिल्यास त्यांना अटक करण्याचे आदेश १५ डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने दिले होते.
दरम्यान, ऊस उत्पादक संघर्ष समितीने २३ जानेवारीपासून पुन्हा आंदोलनाची घोषणा करत शेतकऱ्यांचा जनजागृती मोर्चा काढला होता. सकराने दिलेल्या आश्वासनानुसार पैसे दिले गेले नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तराई येथून आंदोलनाला सुरूवात करून १३ डिसेंबर रोजी राजधानी काठमांडू येथे एकत्र येऊन दुसऱ्यांदा सरकारचा निषेध नोंदवला. थकीत ऊसबिले त्वरीत मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. साखर कारखाने २१ दिवसांत ऊसाची थकीत बिले देतील, शेतकऱ्यांना पैसे त्वरीत मिळतील या सरकारच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी दोन आठवड्यानंतर २८ डिसेंबर २०२० रोजी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आता त्यास एक महिना उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे अद्याप मिळाले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांनी सरकारच्या आदेशानुसार कारखान्याच्या मालकांवर कारवाईस सुरुवात केली आहे.