काठमांडू : ऊस उत्पादक शेतकरी या वर्षी पिकाच्या किमान समर्थन मूल्याच्या सरकारकडून होणाऱ्या घोषणेची प्रतीक्षा करताना थकून गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपले पिक गेल्यावर्षीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आपला ऊस विक्री करण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून किमान समर्थन मूल्य जाहीर होण्याची वाट पाहात आहेत. मात्र, सरकारकडून अद्याप त्यांना कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपले पिक ५९० रुपये प्रती क्विंटल या जुन्या दराने बाबा बैजुनाथ साखर कारखान्याला दिला आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे काहीच पर्याय नाही, त्यामुळे आम्ही आमच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असूनही गेल्यावर्षीच्या दराने याची विक्री करण्याचा निर्णय घेतला.
जर ऊस शेतातच ठेवला तर तो खराब होईल आणि जर तोडणी केली नाही तर उन्हाळ्याच्या हंगामात तो वाळायला लागेल. साखर कारखाने गेल्यावर्षीच्या, ५९० रुपयांच्या दराने उसाची खरेदी करत आहेत. जर सरकारने ऊसाचा काही नवीन दर जाहीर केला तर त्या दराने उर्वरीत रक्कम दिली जाईल असे कारखान्यांनी सांगितले आहे. ऊस तोडणीचा हंगाम नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होतो. मात्र, दोन महिने उलटूनही सरकारने पिकाचा किमान समर्थन दर निश्चित केलेला नाही. गेल्या वर्षी सरकारने ऊसाचा किमान दर ८.३९ टक्के वाढवून ५९० रुपये प्रती क्विंटल केला होता.