नवी दिल्ली : देशभरातील ४३९ साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपाच्या नव्या हंगामाला जोर आला आहे. ३० नोव्हेंबरअखेर ५९२ लाख टन उसाचे गाळप करून ४८.३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ऊस गाळपात जवळपास ८९ लाख टन (+१७.६७ टक्के) आणि साखर उत्पादनात २.९० लाख टन (+६.३८ टक्के) वाढ झाली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत सरासरी साखर उतारा कमी म्हणजे ८.१२ टक्के नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १० टक्के होता. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिजने (NFCSF) चालू हंगामाच्या अखेरीस साखर उत्पादन ३५७ लाख टन होईल, असे अनुमान व्यक्त केला आहे.
प्रसार माध्यमातील एका गटाने भारतामध्ये साखरेचे उत्पादन ७ टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर जगभरातील साखर उद्योगात काहीसा उत्साह आला आहे. मात्र, वास्तवात गाळप किमान ६० दिवस झाल्यानंतरच ऊस आणि साखर उत्पादनाचे स्पष्ट चित्र समोर येवू शकेल. सद्यस्थिती अशी आहे की, दीर्घ काळ लांबलेल्या मान्सूनच्या पावसामुळे देशभरात साखरेचा हंगाम दोन ते तीन आठवडे उशीरा सुरू झाला आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या नव्या साखर निर्यात धोरणाची घोषणा जवळपास एक महिना उशीरा झाली. यासोबतच हंगामाच्या सुरुवातीला असलेली कडाक्याची थंडी नंतर गायब झाली. या सर्व कारणांमुळे काही तज्ज्ञांनी घाई-गडबडीत भारतामध्ये साखर उत्पादन घसरण्याचे अनुमान वर्तवले आहे. ऊस क्षेत्रातील वाढ, जमिनीवरील हवामानाचा प्रभाव लक्षात घेता नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह फॅक्ट्रिजचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सध्याच्या हंगामात साखरेचे उत्पादन ३५७ लाख टन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.