महाराष्ट्रात 15 नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरू होणार

मुंबई -राज्याच्या गाळप हंगाम सुरू होण्यासाठी आता अधिकृतपणे मुहूर्त ठरला आहे. आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली. मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम सुरू करण्यासाठी १५ नोव्हेंबर ही तारीख एकमताने ठरवण्यात आली आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र २ लाख हेक्टरने कमी झाले असून साखर कारखान्यांसाठी परिपक्व उसाचा पुरवठा व्हावा आणि रिकव्हरी चांगली निघावी यासाठी मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम सुरू करण्यासाठी १५ नोव्हेंबर ही तारीख एकमताने ठरवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १५ दिवसांनी उशिरा साखर कारखाने सुरू होणार आहेत. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर परिसरातील ऊस मोठ्या प्रमाणावर कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांसाठी जातो. पण यंदा कर्नाटक राज्यातही साखर कारखाने १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी महाराष्ट्रातील राज्याला दिल्यामुळे आपण १५ नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.

मंत्री समितीच्या या बैठकीमध्ये डॉ. कुणाल खेमनार (साखर आयुक्त) व श्री मंगेश तिटकारे (सहसंचालक, साखर) यांनी लिहिलेले एफआरपी माहिती पुस्तिका २०२४ चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील , शिवेंद्रराजे भोसले, पी. आर. पाटील (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ), बी. बी. ठोंबरे (विस्मा), डॉ. राजगोपाल देवरा (अपर मुख्य सचिव, सहकार) हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here