नवी दिल्ली : ऊस टंचाईच्या झळा, देशात ७७ कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त

कोल्हापूर : देशात महाराष्ट्राने १५ फेब्रुवारीअखेर साखर उत्पादनात अग्रेसर क्रमांक कायम ठेवला आहे. महाराष्ट्रात ६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये ६३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. तर कर्नाटकात ३७ लाख टन साखरेची निर्मिती झाली. मात्र, अपुऱ्या उसामुळे देशातील ७७ साखर कारखान्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत आपल्या गळीत हंगामाची समाप्ती केली आहे. गेल्यावर्षी या कालावधीत केवळ २८ कारखान्यांनी हंगाम संपवला होता. यंदा कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होण्याचा वेग सर्वाधिक आहे. दरम्यान, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यंदा २७० लाख टन साखर तयार होण्याची शक्यता संघाने वर्तवली आहे. गेल्या वर्षी ३१९ लाख टन साखर उत्पादित झाली होती.

अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात व कर्नाटकात अंतिम टप्प्यात उसाची मोठी टंचाई जाणवत आहे. ऊस टंचाईबरोबरच उत्पादनातही सात ते दहा लाख टनापर्यंत घट होत असल्याने कारखान्यांना उद्दिष्टाएवढे गाळप करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. उत्पादन घटीचा तोटा ऊस उत्पादकांबरोबर कारखान्यांनाही होत आहे. सद्यस्थितीत कर्नाटकातील ७९ पैकी ३४ साखर कारखाने पूर्णपणे बंद झाले आहेत. गेल्यावर्षी कर्नाटकात फेब्रुवारी मध्यापर्यंत केवळ १५ कारखान्यांचा हंगाम संपला होता. महाराष्ट्रात २०० पैकी ३० साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्यावर्षी या कालावधीत केवळ ७ कारखाने बंद झाले होते. उत्तर प्रदेशात मात्र केवळ दोन साखर कारखानेच बंद झाले आहेत. देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन २७ लाख टनाने कमी आहे. महाराष्ट्रात गतवर्षीपेक्षा १० लाख टन, उत्तर प्रदेश व कर्नाटक मध्ये ५ लाख टनांनी साखर निर्मिती घटली आहे. साखर उताराही ९.८७ टक्क्यावरून यंदा ९.०९ टक्क्यांवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here