प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्यात वाढ झाल्याने आणि परिणामी आयटीआर सादरीकरणाचा नवा विक्रम झाल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने वेळेत अनुपालन करणाऱ्या करदाते आणि कर व्यावसायिकांचे कौतुक केले आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी 31 जुलै 2023 पर्यंत दाखल केलेल्या आयटीआर ची एकूण संख्या 6.77 कोटी पेक्षा जास्त आहे, जी 31 जुलै 2022 पर्यंत दाखल केलेल्या मूल्यांकन वर्ष 2022-23 (5.83 कोटी) च्या एकूण आयटीआर पेक्षा 16.1% जास्त आहे.
31 जुलै, 2023 रोजी (पगारदार करदात्यांची आणि इतर विना-कर लेखापरीक्षण प्रकरणात देय तारीख) आयटीआर भरण्याचे प्रमाण एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 64.33 लाखांहून अधिक होते. ई-फायलिंग पोर्टलने 31 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 5 PM ते 6 PM दरम्यान आयटीआर दाखल करण्याचा सर्वोच्च प्रति तास दर 4,96,559, आयटीआर दाखल करण्याचा सर्वोच्च प्रति सेकंद दर 486 (31-जुलै-2023: 16:35:06) आणि आयटीआर दाखल करण्याचा सर्वोच्च प्रति मिनिट 8,622 (31-जुलै-2023: 17:54) नोंदवला.
विभागाला 31 जुलै 2023 पर्यंत प्रथमच फाइल करणाऱ्यांकडून 53.67 लाख आयटीआर देखील प्राप्त झाले, जे कर कक्षा विस्तारत असल्याचे द्योतक आहे.
करदात्यांना त्यांचे आयटीआर लवकर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी लक्ष्यित ई-मेल आणि एसएमएस मोहिमांसह सोशल मीडियावर मोहिमा सुरू करण्यात आल्या. अशा एकत्रित प्रयत्नांमुळे करदात्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी त्यांचे आयटीआर मागील वर्षाच्या संबंधित कालावधीच्या प्रमाणात तुलनेने लवकर भरून फलदायी परिणाम दिले.
मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी सादर करण्यात आलेल्या एकूण 6.77 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांपैकी 49.18% विवरणपत्रे आयटीआर-1 प्रकारची (3.33 कोटी), 11.97% विवरणपत्रे आयटीआर-2 प्रकारची (81.12 लाख),11.13% विवरणपत्रे आयटीआर-3 प्रकारची (75.40 लाख), 26.77% विवरणपत्रे आयटीआर-4 प्रकारची (1.81 कोटी) आणि 0.94% विवरणपत्रे आयटीआर-5 ते 7 या प्रकारची (6.40 लाख) आहेत. या विवरणपत्रांपैकी 46% ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध ऑनलाईन आयटीआर सुविधा वापरुन भरण्यात आली आहेत आणि उर्वरित विवरणपत्रे ऑफलाईन आयटीआर सुविधा वापरुन सादर करण्यात आली आहेत.
विवरणपत्रे सादर करण्याच्या सर्वाधिक तातडीच्या काळात, करदात्यांच्या प्रचंड प्रमाणातील लॉगिनची ई-फायलिंग पोर्टलने यशस्वी हाताळणी करून त्यांचे विवरणपत्रे सादर करण्याचे कार्य अत्यंत सुरळीतपणे पार पाडले. दिनांक 1 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत ई-फायलिंग पोर्टलवर 32 कोटींहून अधिक यशस्वी लॉगिन करण्यात आले. 31 जुलै 2023 या एकच दिवशी यशस्वी लॉगिन करणाऱ्यांची संख्या 2.74 कोटी इतकी होती.
मोठ्या संख्येतील करदात्यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या माहितीची तुलना करताना त्यांचे वार्षिक माहिती निवेदन (एआयएस) आणि करदाता माहिती सारांश (टीआयएस) यांचा आधार घेतला हे लक्षात घेतले पाहिजे. करदात्यांना नियमांमध्ये सुलभता प्रदान करण्यासाठी आयटीआर – 1,2,3, आणि 4 यांसाठीची लक्षणीय प्रमाणातील माहिती टीडीएसशी संबंधित माहिती, पुढे सुरु ठेवण्यात आलेले तोटे, एमएटी कर्ज इत्यादींसह वेतन, व्याज,लाभांश, वैयक्तिक माहिती, कर भरणा यांच्याशी संबंधित माहिती आधीच भरण्यात आली होती. करदात्यांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि त्यामुळे कर विवरणपत्रे सादर करण्याचे काम अतिशय सुरळीतपणे आणि वेगाने झाले.
आधार ओटीपी आणि इतर पद्धतींच्या माध्यमातून ई-पडताळणीची प्रक्रिया आयटीआरची पुढील प्रक्रिया सुरु करणे आणि काही परतावे असतील तर ते देणे या संदर्भात वाणिज्य विभागासाठी महत्त्वाची आहे. ई-पडताळणी करण्यात आलेल्या 5.63 कोटी विवरणपत्रांपैकी 5.27 कोटीहून अधिक विवरणपत्रांची ई-पडताळणी आधार क्रमांकावर आधारित ओटीपी(94%) च्या माध्यमातून करण्यात आली. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ई-पडताळणी करण्यात आलेल्या विवरणपत्रांपैकी 3.44 कोटींहून अधिक (61%) विवरणपत्रांची पुढील प्रक्रिया 31 जुलै 2023 सुरु झाली होती.
याशिवाय, पूर्वीच्या प्रोटीअन (NSDL) आधारित OLTAS पेमेंट प्रणाली बदलून ई-फायलिंग पोर्टलवर नवीन ई-पे टॅक्स पेमेंट व्यासपीठ TIN 2.0 उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे करांच्या ई-पेमेंटसाठी अधिक वापरकर्ता-अनुकूल पर्यायांची तरतूद उपलब्ध झाली आणि इंटरनेट बँकिंग, एनईएफटी/ आरटीजीएस, ओटीसी, डेबिट कार्ड, पेमेंट गेटवे आणि यूपीआय सारख्या पेमेंट पद्धतींसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. TIN 2.0 व्यासपीठाने करदात्यांसाठी करांचे रिअल टाइम क्रेडिट सक्षम केले आहे यामुळे प्राप्तिकर परतावा भरणे अधिक सुलभ आणि जलद झाले आहे. जुलै 2023 मध्येच TIN 2.0 पेमेंट प्रणालीद्वारे 1.26 कोटींहून अधिक चलान प्राप्त झाले आहेत, तर 1 एप्रिल 2023 पासून TIN 2.0 द्वारे दाखल केलेली एकूण चलानांची संख्या 3.56 कोटी इतकी आहे.
ई-फायलिंग मदत कक्ष चमूने जुलै, 2023 महिन्यात करदात्यांच्या अंदाजे 5 लाख प्रश्नांची हाताळणी केली आणि परतावा दाखल करण्याच्या व्यग्र कालावधीत करदात्यांना सक्रिय पाठिंबा दिला आहे. करदात्यांना इनबाउंड कॉल्स, आउटबाउंड कॉल्स, लाइव्ह चॅट्स, वेबेक्स आणि को-ब्राउझिंग सत्रांद्वारे मदत कक्षाने सेवा पुरविली आहे. मदत कक्ष चमूने ऑनलाइन रिस्पॉन्स मॅनेजमेंट (ORM) द्वारे विभागाच्या ट्विटर हँडलवर प्राप्त झालेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी देखील काम केले आहे आणि सक्रियपणे करदाते/ भागधारकांपर्यंत पोहोचून त्यांना रीअल-टाइम आधारावर विविध समस्या सोडवण्यासाठी मदत केली.
वेळेचे पालन करण्यात मदत केल्याबद्दल विभागाने सर्वांचे आभार मानले आहेत. सर्व करदात्यांनी परतावा फाइल केल्याच्या 30 दिवसांच्या आत आपले प्राप्तिकर परतावे सत्यापित करावेत तसेच कोणत्याही कारणास्तव ज्या करदात्यांची देय तारीख चुकली आहे त्यांनी ताबडतोब भरणा पूर्ण करावा असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.
(Source: PIB)