बँकॉक : थायलंडमध्ये तांदळाबाबत सुरू असलेल्या संशोधनाने जागतिक अन्न सुरक्षेस मोठी मदत होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून नॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांच्यावतीने तांदळाचे नवे वाण विकसित करण्याबाबत संशोधन सुरू आहे. हवामान बदलाच्या प्रभावाबाबत नवीन वाण लवचिक असून जागतिक तापमान वाढीच्या रुपात येणाऱ्या नैसर्गिक संकटातही तोंड देण्यास सक्षम आहे.
नॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नोलॉजीचे संशोधक मिचाई सियान्ग्लिव यांनी सांगितले की, जर भाताचे पूर, किडींचा हल्ला वा इतर प्रकारच्या बॅक्टेरियामुळे नुकसान होत असेल तर अशा परिस्थितीत या नव्या वाणाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. थाई राईस एक्स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष चारोन लाओथामातास यांनी सांगितले की, थायलंडमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विकासात्मक गरजांकडे दुर्लक्ष केले आहे. आमचा भात तसाच राहिला आहे. जर आपण आता काही कृती केली नाही किंवा तोडगा काढला नाही तर जागतिक बाजारपेठेत आपली स्पर्धात्मकता कमी होईल. आम्हाला स्पर्धा करण्यासाठी उच्च उत्पादन करणाऱ्या तांदळाच्या नव्या वाणाची गरज आहे. २०५२ पर्यंत जगाची लोकसंख्या १० अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाला अन्न मिळण्यासाठी अन्न पुरवठ्यात ५६ टक्के वाढ करावी लागेल.