मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी नवीन वाहने बाजारात आणली जातील. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मी एका कंपनीच्या अध्यक्षांची नुकतीच भेट घेतली होती, ज्यांनी इलेक्ट्रिक वाहने लाँच केली आहेत. त्यांनी (अध्यक्ष) मला सांगितले की, भविष्यात ते फक्त इलेक्ट्रिक वाहने बनवतील.
गडकरी म्हणाले, आम्ही नवीन वाहने आणत आहोत, जी पूर्णपणे इथेनॉलवर चालतील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो स्कूटर 100 टक्के इथेनॉलवर चालतील. गडकरी म्हणाले की, ते ऑगस्टमध्ये टोयोटाची कॅमरी कार लॉन्च करणार आहेत, जी 100 टक्के इथेनॉलवर चालेल आणि 40 टक्के वीजही निर्माण करेल.
ते पुढे म्हणाले, तुम्ही इथेनॉलची पेट्रोलशी तुलना केल्यास ते इथेनॉल 15 रुपये प्रतिलिटर असेल कारण इथेनॉलचा दर 60 रुपये आहे, तर पेट्रोलचा दर 120 रुपये प्रति लिटर आहे. वीज उत्पादनातून मिळणारे उत्पन्न गृहीत धरल्यास इथेनॉलचा सरासरी दर 15 रुपये प्रति लिटर असेल.