सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने पुढील हंगामाचे १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. तरी सर्व वाहतूक कंत्राटदारांनी करार लवकरात लवकर पूर्ण करून चांगल्या प्रतिचा ऊस गाळपास आणावा, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक आमदार अरुण लाड यांनी केले. कारखान्याचा गळीत हंगाम २०२४- २५ च्या तोडणी -वाहतूक करारांचा प्रारंभ आमदार लाड व अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, यंदा १० लाख ९२ हजार टन ऊस गाळप करून कारखाना आघाडीवर राहिला. आगामी हंगामात १४ लाख टन गाळपाचे उद्दीष्ट आहे. यासाठी गाळप क्षमता प्रती दिन ७५०० वरून १० हजार करण्याकरिता मिशनरी बसवली जात आहे. कारखान्याने महाराष्ट्रात प्रथम तोडणी वाहतूक दर १५ टक्क्यांनी वाढवला. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ३४ टक्के मधील फरक ही तोडणी वाहतुकदारांना दिला. यावेळी संचालिका अजंना सूर्यवंशी, अश्विनी पाटील, संचालक जयप्रकाश साळुंखे, अनिल पवार, दिलीप थोरबोले, अशोक विभुते कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांनी प्रास्ताविक केले.