NFCSF आणि NCDC संयुक्तरित्या साखर कारखान्यांना 10,000 ऊस तोडणी यंत्रे देणार

नवी दिल्ली : साखर उद्योग अधिक कार्यक्षमता आणि उत्पादकतेकडे वाटचाल करत असताना ऊस शेतीमध्ये यांत्रिकीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार आहे. जास्तीत जास्त ऊस तोडणी यंत्रांचा वापर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यासाठी NFCSF आणि NCDC यांनी पुढाकार घेतला आहे. यांत्रिक तोडणीमुळे मजूर टंचाईवर मात करण्याबरोबरच शेतकऱ्यांची कार्यक्षमता आणि नफा वाढण्यास मदत होणार आहे.नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) चे एमडी प्रकाश नाईकनवरे यांनी साखर उद्योगातील सहकारी क्षेत्रातील अनुभव सांगताना यांत्रिक शेतीच्या निकडीवर भर दिला.

६४ व्या आयएसओ कौन्सिलच्या बैठकीत ‘ऊस शेती सुलभीकरण : यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण’ या विषयावरील अभ्यासपूर्ण सत्राचे पॅनेललिस्ट म्हणून, प्रकाश नाईकनवरे म्हणाले की, “महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये बहुसंख्य साखर कारखाने सहकारी आहेत. देशातील एकूण साखर आणि इथेनॉल उत्पादनात त्यांचा मोठा वाटा आहे. या तीन राज्यांमध्ये ऊस तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाताने केले जाते. सुमारे दहा लाख ऊसतोड मजूर गाळप हंगामामध्ये विविध ठिकाणांहून स्थलांतर करतात. उत्तम शिक्षण आणि संधीच्या शोधात असणारी उसतोड मजुरांची पुढची पिढी हे काम करायला तयार नाही. कारण हे काम खूप कष्टाचे आणि कठीण आहे. भारतात यांत्रिक ऊस तोडणी ही काळाची गरज बनली आहे.

नाईकनवरे म्हणाले कि, जरा कल्पना करा की ऊसतोड मजुरांच्या अनुपस्थितीत ऊस शेतात उभा राहू दिला तर काय होईल? ऊस वाळण्याचा आणि गुणवत्ता घटण्याचा धोका आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आम्ही NFCSF ने पुढाकार घेतला आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NCDC) आणि NFCSF यांनी देशातील सहकारी साखर कारखान्यांना 10,000 ऊस तोडणी यंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी आणि पुढच्या वर्षी ही यंत्रे पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे 2025-26 च्या अखेरीस, विविध आकाराचे, विविध क्षमतेची ऊस तोडणी यंत्रे उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तोडणी यंत्र कोणाला द्यायची याची निवड साखर कारखानदारांवर सोपवली जाईल. NCDC कडून येणाऱ्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून ऊस तोडणी दिली जातील. नाईकनवरे म्हणाले कि, ही खूप मोठी योजना असणार आहे आणि येत्या दोन ते तीन वर्षात त्याचे परिणाम दिसून येतील. यामुळे सहकारी साखर क्षेत्राची संपूर्ण दिशाच बदलणार आहे.

रोशन लाल तमक, सीईओ, डीसीएम श्रीराम लिमिटेड यांनी 64 व्या ISO परिषदेच्या बैठकीत कृषी उत्पादकता वाढवण्यात तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करून ‘ऊस शेती करणे सुलभ: यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण’ यावर प्रकाश टाकला. ऊस शेतीमध्ये यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण बळकट करण्यासाठी सरकारच्या सहाय्यक धोरण आराखड्याची माहिती त्यांनी दिली.

यांत्रिक कापणीच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले, “ऑस्ट्रेलियामध्ये 100 टक्के यांत्रिकीकरण आहे, ब्राझीलमध्ये 80 टक्के यांत्रिकीकरण आहे, थायलंडमध्ये 35 टक्के यांत्रिकीकरण आहे, परंतु भारतात ते फक्त 4 टक्के आहे. पण असे असले तरी भारतात 2019 ते 2024 पर्यंत यांत्रिक कापणीमध्ये 311 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ही एक अद्भुत उपलब्धी आहे. ISMA चे अध्यक्ष एम. प्रभाकर राव यांनी साखर उद्योगातील वाढ आणि विकासाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. उसामध्ये ठिबक सिंचनामुळे पाण्याचा वापर ३०-४०% कमी कसा होतो आणि उत्पादन वाढू शकते हे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here