नवी दिल्ली : या वर्षी देशभरातील ४६३ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या २५ ने कमी आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस २६५३ लाख टन ऊस गाळप करण्यात आले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १०२ लाख टनाने अधिक आहे. या हंगामात साखरेचे उत्पादन २६० लाख टन झाले आहे, जे गेल्या वर्षी समान कालावधीत झालेल्या उत्पादनापेक्षा ७ लाख टन अधिक आहे. मात्र, देशाचा सरासरी साखर उतारा ९.७८ टक्के नोंदविण्यात आला आहे, जो गेल्यावर्षीच्या समान कालावधीतील उच्चांकी ९.९३ टक्केपेक्षा ०.१५ टक्क्याने कमी आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील ६१ कारखान्यांनी आपला गळीत हंगाम पूर्ण केला आहे.आणि देशातील निम्म्यापेक्षा अधिक कारखान्यांचा हंगाम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-आपरेटिव्ह शुगर फॅक्ट्ररीजचे (एनएफसीएसएफ) अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, चालू हंगाम २०२२-२३ च्या अखेरपर्यंत ३३४ लाख टन साखर उत्पादनाचे अनुमान आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे उत्पादन २५ लाख टनाने कमी असेल. गेल्या वर्षी ३५९ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
ते म्हणाले, ३३४ लाख टन निव्वळ साखर उत्पादन हे इथेनॉल उत्पादनासाठी जवळपास ४५ लाख टन साखर डायव्हर्शनपेक्षा अतिरिक्त आहे. म्हणजेच देशात एकूण साखर उत्पादन ३७९ लाख टन होईल अशी शक्यता आहे. वार्षिक २७५ लाख टनाचा स्थानिक खप, हंगामाच्या सुरुवातीला ६२ लाख टनाचा सुरुवातीचा साठा आणि ६१ लाख टन साखर निर्यातीसह हंगामाच्या अखेरीस ६० लाख टन साखर शिल्लक राहिल. चालू हंगाम, ऑक्टोबर २०२३ नंतर जवळपास अडीच ते तीन महिने देशांतर्गत साखरेची गरज पूर्ण करण्यास सक्षम असेल. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या म्हणण्यानुसार, हे अनुमानीत आकडे साखरेच्या स्थानिक किमती स्थिर ठेवण्यात योगदान देतील.
गेल्यावर्षी महाराष्ट्रासह शेजारील राज्य कर्नाटक, गुजरातमध्ये दीर्घ काळासाठी पाऊस झाला होता. याशिवाय, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ढगाळ हवामानामुळे उसाचे वजन आणि उसाच्या साखर उताऱ्यावर प्रतिकूल परिणाम झाला. मात्र नव्या हंगामात गेल्यावर्षीच्या खोडवा उसाचे प्रमाण कमी असेल आणि त्याचा अनुकूल परिणाम त्याच्या पुढील वर्षात पाहायला मिळेल. मात्र, अमेरिकेच्या हवामान विभागाने जुलैच्या अखेरपर्यंत अल नीनोच्या धोक्याचा संकेत दिले आहेत. यासोबतच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजने सांगितले आहे की, २०२३-२४ मधील साखर उत्पादन आणि गळीत हंगाम यावर अल नीनोचा प्रतिकूल परिणाम होण्याची कमी शक्यता आहे.