कागवाड : कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील कागवाड (कर्नाटक) येथील शिरगुप्पी शुगर वर्क्स लि. या कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ९ लाखाहून अधिक टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याचे व्यवस्थापक अरुण फरांडे यांनी ही माहिती दिली. हे उद्दिष्ट पुढील वर्षी १२ लाख टनांपर्यंत नेण्यात येणार आहे. २०२० पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसाची एकरकमी एफआरपीची रक्कम जमा केली जात आहे असे त्यांनी सांगितले.
व्यवस्थापक फरांडे म्हणाले की, एकरकमी एफआरपीची प्रथम घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडण्यात शिरगुप्पी शुगरचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा मगेणावर व उपाध्यक्ष यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कागवाड येथे २०१२-१३ मध्ये सुरू झालेल्या शिरगुप्पी शुगर वर्कस् लिमिटेड कारखान्याने एका दशकात म्हणजे २०२४ पर्यंत गगनभरारी घेतली आहे. अनेक बेरोजगारांच्या मोकळ्या हातांना काम देऊन संसार फुलविले आहेत. कारखान्याने ‘काटा चोख पेमेंट रोख’ हा फॉर्म्युला राबविला आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.