पुणे : निरा-भिमा कारखाना चालू होणाऱ्या गळीत हंगामात इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देणार आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामामध्ये ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले.
अध्यक्ष पवार म्हणाले की, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये गळीत होणाऱ्या ऊसापोटी बिलाचा पहिला हप्ता २,५०० रुपये देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर कारखान्यांप्रमाणे ऊस बिलाचे उर्वरित हप्ते दिले जातील. चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसाची सर्व बिले, वाहतूक कंत्राटदारांची बिले ही नियमितपणे देण्याचे नियोजन केले आहे.
दरम्यान, कारखान्याच्या कामगारांसाठी दिवाळीसाठी एक महिन्याचा बोनस जाहीर करण्यात आला आहे, असे अध्यक्ष पवार यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते.