केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 6 ऑक्टोबर 2022 रोजी आभासी माध्यमातून झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) प्रादेशिक कार्यालयाचे (पश्चिम) उद्घाटन केले. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); नियोजन राज्यमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
चेन्नईतील प्रादेशिक कार्यालय (दक्षिण) (फेब्रुवारी 2021 मध्ये उद्घाटन) आणि कोलकाता (एप्रिल 2022 मध्ये उद्घाटन) प्रादेशिक कार्यालय (पूर्व) नंतर आता मुंबईतील प्रादेशिक कार्यालय (पश्चिम) हे भारतीय स्पर्धा आयोगाद्वारे सुरु करण्यात आलेले तिसरे प्रादेशिक कार्यालय आहे.
निर्मला सीतारामन यांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणात, भारतीय स्पर्धा आयोगाचे मुंबईत प्रादेशिक कार्यालय सुरु केल्याबद्दल अभिनंदन केले आणि व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने, भारतीय स्पर्धा आयोगापर्यंत सुलभतेने पोहोचणे व्यवसायांसाठी महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. विविध प्रादेशिक भाषांमध्ये मार्गर्शन पुस्तिका प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी स्पर्धा आयोगाची प्रशंसा केली आणि उचललेली अशाप्रकारची पावले लोकांना नियामकापर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यासाठी सक्षम करतात असे त्या म्हणाल्या. वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल बाजारपेठांसंदर्भात बोलताना सीतारामन यांनी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचे मापदंड निश्चित करण्याच्या आणि व्यवहारातील स्पर्धेच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या गरजेवर भर दिला. ज्यांना मदत हवी आहे त्यांना सुविधा उपलब्ध करून देत सक्रिय भारतीय स्पर्धा आयोग त्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि समस्या हाताबाहेर जाण्याआधी लोकांना योग्य प्रकारे मदत यामाध्यमातून मिळेल असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात वित्तमंत्र्यांनी “कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया – ए जर्नी थ्रू द इयर्स, 2009 – 2022” नावाच्या सचित्र ई-पुस्तकाचे प्रकाशनही केले. या पुस्तकात भारतीय स्पर्धा आयोगाच्या सुरुवातीच्या वर्षांचे दस्तऐवजीकरण आहे आणि आयोगाच्या आतापर्यंतच्या प्रवासाला आकार देण्यासाठी मदत करणाऱ्या विविध उपाययोजना, घटना आणि कृतींचा आढावा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाच्या सीसीआयच्या उर्दू आणि पंजाबी भाषांमध्ये अनुवादित केलेल्या स्पर्धा मार्गदर्शन पुस्तिकांचेही प्रकाशनही केले. या पुस्तिकेत – भारतीय स्पर्धा आयोग , व्यापारी संघ , स्पर्धात्मक संगनमतातुन होणारी बोली प्रक्रिया (बिड रिगिंग), वर्चस्वाचा गैरवापर, संयोजन, शिथिलता यासंबंधीची माहिती कशी दाखल करावी यासारख्या विषयांवर माहिती देण्यात आली आहे. उर्दू आणि पंजाबी भाषांव्यतिरिक्त, या पुस्तिकेचा यापूर्वी तेलगू, बंगाली, मराठी, तमिळ, मल्याळम, कन्नड, आसामी, गुजराती आणि ओडिया, हिंदी आणि इंग्रजी अशा 11 भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.
भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात, प्रादेशिक कार्यालये स्थापन करणे हे स्पर्धेच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार गुप्ता यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. देशाच्या आर्थिक केंद्रात भारतीय स्पर्धा आयोगाच्या प्रादेशिक केंद्राची स्थापना असंख्य भागधारकांना सुलभता प्रदान करेल, या प्रदेशात स्पर्धेबद्दल मार्गदर्शन पोहोचवून भागधारकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करेल ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली.
भारतीय स्पर्धा आयोगाच्या सचिव ज्योती जिंदगार भानोत यांनी आभार प्रदर्शन केले.