मुंबई : देशात सध्या अतिरिक्त साखरेची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देशातील तेलाची आयातही घटणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर मिळतील.
चालू हंगामात मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन झाल्यामुळे सरकारने बी हेवी मोलॅसीसमध्ये साखर मिश्रित इथेनॉल उत्पादन ६२.६५ रुपये प्रती लिटर दराने खरेदी करावे अशी अपेक्षा साखर उद्योगाची आहे. केंद्रीय परिवहन तथा एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी अलिकडेच याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र सरकारला अशाच मागणीचा केंद्राकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साखर साठा आहे. मी अलिकडेच एक प्रस्ताव दिला आहे. आणि महाराष्ट्र सरकारलाही याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करण्यास सांगितले आहे असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.
गडकरी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याद्वारे सुरू करण्यात आलेल्या मेडिकल ऑक्सिजन प्लांटच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभात ही माहिती दिली. ते म्हणाले, बी हेवी मोलॅसिसमध्ये समारे १५-२० टक्के साखर मिश्रण करून इथेनॉल उत्पादन होऊ शकते. उसाच्या रसापासून उत्पादीत इथेनॉलचा दर सुमारे ६० रुपये प्रती लिटर आहे. जर पेट्रोलियम मंत्रालयाने साखर मिश्रीत इथेनॉललाही तसाच दर दिला तर महाराष्ट्रातील २५ लाख टन साखरेचा वापर अशा पद्धतीने करता येऊ शकतो असे गडकरी म्हणाले.
अशा प्रकारे साखर कारखान्यांना साखरेसाठी ३६ रुपये प्रती किलो दर मिळेल. आणि कारखान्यांच्या गोदामांतही साखर ठेवण्यासाठीचा खर्च येणार नाही असे गडकरी यांनी स्पष्ट केले.