पर्वरी (गोवा) : गोव्यातील एकमेव साखर कारखाना बंद पडला आहे. संजीवनी साखर कारखान्याचे इथेनॉल उत्पादन प्रकल्पात रुपांतर करून त्याचे पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नांनादेखील एकही बोलीदार मिळालेला नाही, अशी माहिती कृषीमंत्री रवी नाईक यांनी सभागृहात सांगितले. मंत्री नाईक यांनी सदस्यांना सांगितले की, संजीवनी सहकारी साखर कारखाना लिमिटेड (SSSKL) सध्या बंदच आहे.गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी या भागातील ऊस शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दक्षिण गोव्यातील धारबांदोडा गावात हा कारखाना स्थापन केला आहे.
मंत्री नाईक म्हणाले की,संजीवनी सहकारी साखर कारखान्यात निवडून आलेले संचालक मंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे कारखान्याचा कारभार पाहण्यासाठी राज्य सरकारने प्रशासक नेमला आहे. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, संजीवनी सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या पुनर्विकासाचा भाग म्हणून इथेनॉल प्लांटच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मोडच्या योजनांवर विचार केला जात आहे.गोवा सरकारच्या ई-प्रोक्योरमेंट सिस्टमने संजीवनी सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या पुनर्बांधणीसाठी सक्षम आणि पात्र बोलीदारांची ओळख करून देण्यासाठी विनंती अर्ज (RFQ) आमंत्रित केले आहेत. यामध्ये पीपीपी तत्त्वावर इथेनॉल उत्पादन करणे अपेक्षित आहे.