हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा
कोल्हापूर : चीनी मंडी
केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात २०० रुपये प्रति क्विंटल वाढ केली. त्यामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला. पण, त्यांनी नव्या दराने काढलेल्या साखर विक्रीच्या टेंडरना देशांतर्गत बाजारपेठेतून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा साखर कारखान्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.
देशांतर्गत बाजारातील साखरेचा विक्री दर कमी असल्याची तक्रार साखर उद्योगातून होत होती. स्थानिक बाजारात साखरेला उठाव नाही आणि साखरेची निर्यात परवडत नाही, अशा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या साखर कारखान्यांना किमान विक्री दरात झालेल्या वाढीमुळे दिलासा मिळाला होता. साखरेचा विक्री दर २९०० रुपये होता. तर, तो ३१०० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला. त्यामुळे साखर उद्योगात चैतन्य आले.
सध्या राज्य बँकेने साखरेचे मुल्य वाढवलेले नाही. पण, बाजारात ३१०० रुपये दराने साखर विक्री झाल्यास बँका मुल्य वाढवतील आणि कारखान्यांना एफआरपीची बिले भागवण्यासाठी अर्थसहाय्य मिळू शकते. त्यामुळे किमान विक्री दरवाढीच्या घोषणेनंतर साखर कारखान्यांनी टेंडर काढले पण त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. किमान विक्री दर वाढवण्याच्या आधीच्या दराची साखर नव्या दराने विकूनच व्यापारी पुन्हा खरेदीला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील काळातही साखरेला फारसा उठाव मिळण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारखान्यांच्या अधिकाऱ्यांकडून बाजारपेठांचा अंदाज घेण्यात येत आहे.
निर्यात मंदावलेलीच
केंद्राचे अनुदान आणि इतर सवलती असल्या तरी निर्यात फारशी गतीने होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूर विभागातून ३१ डिसेंबरअखेर केवळ ३२ हजार टन साखर निर्यात झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ पैकी १२, तर सांगली जिल्ह्यातील १४ पैकी पाच अशा विभागातील १७ कारखान्यांकडून एक पोतेही साखर निर्यात झालेली नाही. निर्यात साखरेच्या पोत्यावर बॅंकांनी दिलेली उचल व आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर यात प्रतिक्विंटल सुमारे एक हजार रुपयांची तफावत आहे. या शॉर्ट मार्जिनच्या विषयामुळे साखर निर्यात मंदावली आहे. सरकार हा विषय सुटल्याचे सांगत असले तरी, त्यानंतर निर्यात वाढल्याचे चित्र दिसणे अपेक्षित होते. पण, तसे चित्र बाजारात दिसत नाही.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp