भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून बाहेर केलेल्या २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया, उद्या म्हणजे मंगळवार २३ मे २०२३ पासून सुरू होत आहे. तुम्ही कोणत्याही बँकेच्या ब्रँचमध्ये जावून तुमच्याकडील या मोठ्या नोटा सहजपणे बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. तुमच्याकडे ओळखपत्रही मागितले जाणार नाही. एकाच वेळी २००० रुपयांच्या १० नोटा बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चनलातून बाहेर केलेल्या नोटा बदलताना ओळखपत्र दाखवावे लागेल असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. मात्र, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या सर्व शाखांना कळवले आहे की, आरबीआयकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासआठी कोणताही फॉर्म अथवा कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही. २००० रुपयांऐवजी इतर मूल्याच्या नोटा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्यास मुभा आहे.
कोणतीही व्यक्ती एका वेळी २०,००० रुपये बदलू शकते. ही प्रक्रिया राबविण्यासाठी आरबीआयच्या निर्देशानुसार, सर्व बँकांनी आपली तयारी केली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने देशात नोटाबंदी करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्या होत्या. त्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या. २०१७ मध्ये खास करुन या नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आणल्या गेल्या.