औंढा नागनाथ : सरकार कोणाचेही असो, आमची दैन्यावस्था संपत नाही अशी व्यथा हिंगोली लोकसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ तालुक्यातील ऊसतोड कामगारांनी मांडली. तालुक्यातील शेकडो ऊसतोड कामगार दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुलाबाळासह परजिल्ह्यात तर कधी परराज्यात रवाना होतात. यामध्ये बंजारा समाजाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुकादमाकडून घेतलेल्या उचल रकमेची (कोयता) परतफेड करण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या या टोळ्या फिरतात. औंढा नागनाथ तालुक्यातून २ हजारपेक्षा जास्त कामगार दरवर्षी ऊसतोडीसाठी जातात. त्यांना सुविधा पुरविण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
ऊस तोड कामगारांच्या जोडप्याला दिवसाकाठी ५०० ते ६०० रुपये मिळतात. ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरम्यान, महिला व शालेय मुलांची फरपट होते. मुलाबाळांसह स्थलांतर करावे लागत असल्याने शाळकरी मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होते. पूर्वी स्थलांतरित कुटुंबांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह चालविले जात असे. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून ती वसतीगृहे बंद आहेत. आता मुलांना फडावर नेल्याशिवाय पर्याय नाही असे पालकांनी सांगितले. राज्य सरकारने ऊसतोड कामगारांसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. मात्र प्रत्यक्षात एकाही ऊसतोड कामगाराला या महामंडळाचा लाभ झालेला नाही असे ऊस तोड कामगारांनी सांगितले.